अस्वलाची अस्सल गोष्ट
अस्वलाची अस्सल गोष्ट
सुमारे ११०,००० वर्षांपूर्वी, (सध्याच्या फ्रान्स मधे राहणाऱ्या) निॲंडरथल मानव शिकारींनी एकत्रीत केलेल्या मोठ्या तपकिरी अस्वलांची (आता नामशेष झालेल्या) कवटी व हाडे सापडली आहेत. अंदाज असा आहे की काही हजार वर्षे तरी पूजा-परंपरा वा काही मृत्यु संबंधीत रिवाज म्हणून निॲंडरथल मानवासाठी अस्वल महत्वाचे होते.
अस्वलाच्या निॲंडरथल पासुन आजच्या प्रवासादरम्यान मध्ययुगीन काळात साहित्यातही प्रवेश झाला. मध्ययुगीन कथांमध्ये ब्रुईन अस्वल ही एक लोकप्रिय व्यक्तिरेखा होती. रशियामध्ये, लोकसाहित्यात असणारा अस्वल नंतर "मिश्का" नावाच्या एका व्यंगचित्रात विकसित झाला. रशियातील १९८० च्या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान उर्वरित जगानेही मिश्काची स्पर्धेचा शुभंकर (mascot) या नात्याने भेट घेतली.
दरम्यान टेडी बिअर, विनी-द-पूह, पॅडिंग्टन बिअर, बिग टेडी आणि लिटल टेडी (एचसी क्रॅडॉक यांच्या कथांच्या सेटमधील पात्र), योगी आणि बू-बूअर, स्मोकी आणि फोझी अस्वल हे सर्व अस्वल राज्यातील मित्र आणि त्यांची बनवलेली खेळणी लहान मुलांना खूप आवडू लागली आहेत.
आधुनिक काळात अस्वल अजूनही शक्ती, धैर्य आणि सहनशक्तीचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्रात अनेक ठीकाणी अस्वलाच्या केसांपासुन बनवलेल्या मनगट्या लहान मुलांच्या मनगटात घालायची प्रथा होती. अशाने बाळ झोपेत दचकत नाही असे समजले जात असे.
अस्वल व मानवात बरीच वैशिष्ट्ये सामायिक आहेत. ज्यात उभे राहण्याची आणि मिठी मारण्याची क्षमता देखील समाविष्ट अहे. याखेरिज अस्वल आपल्या संततीचे/शावकांचे तीव्रतर भावनेने संरक्षण करतात. अस्वलाला कधीकधी "जंगली विदुषक" असेही म्हटले जाते. याचे कारण ते नाचतात, खाजवतात, दोन पायांवर उभे राहण्याची करामत करतात, शिवाय बसुन मागच्या पंजावर डोके ठेवतात.
गोष्ट टेडी बिअरची
दिवस होता १४ नोव्हेंबर १९०२. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट मिसिसिपीच्या ओनवर्ड जवळ अस्वलाच्या शिकारीला जात असताना या गोष्टींची सुरुवात झाली. मिसिसिपीचे तेंव्हाचे राज्यपाल अँड्र्यू एच. लाँगिनो यांनी त्यांना आमंत्रित केले होते. इतर सर्वांना शिकार मिळाली पण थिओडोर यांना एकही अस्वल सापडले नव्हते. त्यावेळी हॉल्ट कॉलर यांच्या नेतृत्वात रुझवेल्टच्या सहाय्यकांनी एका काळ्या अस्वलाला झाडाशी बांधून रुझवेल्ट यांना बोलावले आणि त्यांनी त्या बांधलेल्या अस्वलाची शिकार (?) करावी अशी गळ घातली. पण रुझवेल्टनी अस्वल मारण्यास नकार दिला. या घटनेची बातमी देशभरातील वर्तमानपत्रातील लेखांद्वारे पटकन पसरली. या लेखांमध्ये अस्वल मारण्यास नकार देणार्या अध्यक्षांची कथा सांगितली गेली.क्लिफोर्ड बेरीमन या राजकीय व्यंगचित्रकाराने सुद्धा हा लेख वाचला आणि हा प्रसंग व्यंगचित्रात व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. 16 नोव्हेंबर 1902 वॉशिंग्टन पोस्टमध्ये १६ नोव्हेंबर १९०२ ला बेरीमनचे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले. यामधे अस्वलाचे शरिर आकाराने लहान दाखवत त्याला एक निरागस रुप दिले होते. ब्रूकलिन कँडी शॉप चे मालक मॉरिस मिच्टम यांनी हे व्यंगचित्र पाहिले आणि त्यांना एक (व्यापारी) कल्पना सुचली. त्यांनी आणि त्यांची पत्नी रोझ यांनी काही कापूस, पेंढा यासारख्या गोष्टी भरुन वेगवेगळ्या प्राण्यांची मऊ खेळणी बनवली. शिवाय एक अस्वल तयार करुन अस्वलाला मारण्यास नकार देणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना त्याला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. थिओडोर रुझवेल्ट यांच्याच परवानगीने त्यांचे सोपे नाव वापरुन त्याने त्याला 'टेडीचा अस्वल' (Teddy’s Bear) असे नाव दिले.
यानंतर मिच्टॉम यांनी तयार केलेले हे खेळण्यांचे अस्वल इतके लोकप्रिय झाले की मिच्टॉम यांनी लवकरच आयडल टॉय कंपनीची स्थापना केली. आज टेडी बियर जगभरात लोकप्रिय आहे.
जर्मनीत....
तसे या टेडी बिअर अस्वलाच्या जन्माचे श्रेय एकट्या अमेरिकेला जात नाही. या टेडी बिअरचा जन्म एकाच वेळी जगातील दोन भागात झाला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच जर्मनीच्या गेजेन येथे मार्गारेट स्टीफने आपल्या कुटूंबाच्या मालकीच्या छोट्या कारखान्यात प्राण्यांच्या आकाराची भरलेली मऊ खेळणी बनविली होती. (विशेष म्हणजे या मार्गारेट पोलीओग्रस्त होत्या.) पुतण्या रिचर्ड स्टिफने मार्गारेटना अस्वल बनवण्यास प्रोत्साहित केले होते. मार्गारेटना शंका होती की खऱ्या अस्वलाप्रमाणे बनवल्यास खेळण्यातील अस्वल खूप भयंकर होईल, म्हणून अस्वलाच्या चेहऱ्यात काही प्रमाणबद्ध बदल केले होते.
बाजारपेठेत.....
खेळण्यांच्या जागतीक बाजारपेठेत टेडीचा बराच वाटा आहे. सन २०१८ मध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार कालावधीत अशा कापूस/पेंढा भरवलेल्या खेळण्यांच्या बाजारपेठेचे मूल्य ९ अब्ज डॉलर्स होते आणि ते २०२५ पर्यंत अंदाजे ६/७% वेगाने वाढतच राहील असे अनुमान आहे.
मानसशास्त्र
मानसशास्त्रज्ञ टेडी अस्वलाशी असलेले आपले संबंध "संक्रमणकालीन" म्हणून स्पष्ट करतात. मुलांचे त्यांच्या पालकांवर अवलंबून असणे कमी होण्यासाठी काहीजण टेडीवर अवलंबून असतात. मानसशास्त्रज्ञ कोरीन स्वीट यांच्या मते (२०१० चे प्रसिद्धीपत्रक) टेडी बिअर सारख्या खेळण्यांमुळे मनात शांतता व सुरक्षिततेची भावना निर्माण होते. या प्रकारची भावना लहान मुले व प्रौढ या सर्वांसाठीच आवश्यक असते.
व्हॅलेंटाईन विक
गेली २००० वर्षे व्हॅलेंटाईन डे साजरा होतो. परंतु २००८ पर्यंत कुठेही व्हॅलेंटाईन विक किंवा पूर्ण आठवडाभर साजरा करण्यासारखे काही विशिष्ठ कारण नव्हते. सन २००८ नंतर बाजारपेठेत अस्तित्वात आलेल्या व्हॅलेंटाईन विकमधे ‘टेडी डे’ सुद्धा समाविष्ट झाला आणि लहान मुलांच्या खेळण्यांच्या बाजारपेठेचा एका भागाचा युवा वर्गही ग्राहक बनला.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा