गुलाब-
गुलाब-
मेसोपोटेमीया, युनान-रोम, येथील संस्कृती असोत, वा बाबर, नुरजहाॅं, नेपोलीयन, पं. जवाहरलाल नेहरु असे राज्यकर्ते असोत, अथवा विरसिंग, शेक्सपियर सारखे साहित्यीक - या सर्वांची आणि सर्वसामान्यांची गुलाबाची आवड सर्वश्रुत आहे.
आज या धाग्यात गुलाबाविषयी काही स्फुट-
रोमन लोक आपल्या भोजन-कक्षाचे छत गुलाबाच्या फुलांनी सजवत असत. त्यापाठीमागे त्यांची अशी मान्यता होती की भोजनास आलेल्या अतिथींनी गुलाब पाहुन हे लक्षात ठेवावे की भोजनादरम्यान यजमानासह केलेल्या वार्तालापाची वाच्यता बाहेर करु नये. “गुलाबाच्या खाली” जे काही असेल ते ‘गुप्त’ असे समजले जात असे.
एक अरबी गुलाबी सुरस कथा अशी आहे की-
सर्वच गुलाबांचा रंग पूर्वी पांढरा होता. पण एका रात्री एका बुलबुलची भेट गुलाबाशी झाली आणि बुलबुल प्रेमाच्या रंगात रंगुन गेली. त्या भेटीनंतर बुलबुल चा आवाज़ सुरेल सुरमई झाला. एकदा अचानक गुलाबाचा एक काटा बुलबुलच्या ह्रदयात लागला. त्या लाल रक्तवर्णाला पाहुन त्यानंतर मात्र पांढरा शुभ्र असणारा गुलाब लाल-गुलाब झाला.
सुरस कथा सोडून प्रत्यक्ष जीवनाकडे पाहता- दक्षिण सायबेरियातील ७००० वर्षांपूर्वीच्या एका कबरीत सापडलेल्या चांदीच्या भांड्यावर गुलाबाची नक्षी कोरलेली आहे. हा गुलाबाच्या संबंधीत वापराचा आजवर आढळलेला सर्वात जुना पुरावा आहे.
युनेस्कोच्या जागतीक वारसा यादीत समाविष्ट असणाऱ्या हिलशाईम (जर्मनी) येथील चर्चच्या भिंतीवर १००० वर्षे जुने गुलाबाचे झाड आजही पहायला मिळते. त्याला आता ‘सहस्त्र वर्षीय गुलाब’ म्हणून संबोधले जाते आहे. हे गुलाबाचे झाड पृथ्वीवरच सर्वात जुने जीवंत असणारे गुलाबाचे झाड आहे.
नेपोलियनची पत्नी गुलाबाच्या फुलांची शौकिन होती. नेपोलीयन आपल्या अधिकाऱ्यांना अनेकदा बुट्टी-टोकरी भरभरुन गुलाब देत असे. गुलाबाच्या पाकळ्या वाईनमधे उकळल्यास हे मिश्रण जखमा बऱ्या करण्यास सहाय्यक ठरते असा त्यावेळी विश्वास होता.
मुघल बादशाह बाबरने भारतात येताना उंटाच्या पाठीवर भरुन अनेक गुलाब आणले होते असे सांगतात. गुलाबाच्या अत्तराच्या शोधाचे श्रेय नुरजहाॅं कडे जाते असे म्हणतात.
गुलाबाचा संबंध प्रेमाशी येतो तो सौंदर्य व प्रेमाची देवता मानल्या गेलेल्या व्हीनस या रोमन शुक्रदेवतेमार्फत. या शुक्रदेवीस गुलाब हे फुल अत्यंत प्रिय! या गुलाबाचा संबंध शुक्रदेवीचा पुत्र क्युपिड (मदन?) याच्याशी तसेच बाकूस या वाईनदेवतेशीही असल्याने गुलाबाचे महत्व अनेकपटीने वाढले होते.गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त करत असाल तर त्यापाठीमागे असणाऱ्या या सर्व भावना ध्यानात घ्यायला विसरु नका.
वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने ३५००००० वर्षे जुना असणारा गुलाब Rosaceae कुळातील असुन त्याचा जीनस Rosa आहे, तसेच या गुलाबाच्या वेगवेगळ्या १०० स्पेसीज ज्ञात आहेत. या सर्व प्रजाती जगातील वेगवेगळ्या भागातून (द. अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया) येतात.
नैसर्गीक गुलाब अनेक रंगांत मिळत असे- अपवाद निळा व काळा. परंतु सध्या संकरण करुन निळा गुलाब विकसित केला गेला आहे. आपण ज्याला काळा गुलाब समजतो तो काळा नसुन वास्तविक अतिशय गर्द असा नीलवर्ण असतो.
गुलाबाचा प्रत्येक रंग वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. पिवळा गुलाब मैत्री व काळजी, यांचे प्रतिक आहे. ज्याच्याप्रति प्रेमभावना असते त्या व्यक्तीला पिवळा गुलाब देणे टाळले जाते. कोणी पिवळा गुलाब दिल्यास त्याचा छुपा अर्थ “प्रेमाच्या शृंगारिक नात्यास नकार” असा घेतला जातो. गर्द गुलाबी रंगाचा गुलाब आभार प्रदर्शित करतो. फिका गुलाबी रंग सहानुभूती दर्शवतो. मध्यम गुलाबी रंगांचा गुलाब सर्व प्रसंगी वापरला जाऊ शकतो. पांढरा गुलाब पावित्र्य व निरागसता यांचे प्रतिक आहे. विवाह व ख्रिश्चन धार्मिक कार्यक्रमांत पांढरा गुलाब वापरला जातो. जांभळा गुलाब राजेशाही व वैभवाचे प्रतिक आहे. नारिंगी-केशरी रंगाचा गुलाब उत्साह व तीव्रतर आवडीची भावना सांगतो. लाल गुलाब........ सांगायलाच हवे का?
गुलाबापासून अत्तर, तेल, गुलाबपाणी, गुलकंद असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यांचे अनेक पारंपरिक महत्वाचे औषधी गुणधर्म आहेत.
गुलाब राजकीय दृष्टीनेही वजनदार आहे. गुलाबास अमेरिका, ईंग्लंड आणि मालदीव या देशांनी आपले राष्ट्रीय फुल म्हणून मान्यता दिली आहे.

खुप छान माहिती 👌🏻🌹
उत्तर द्याहटवाThank you.
हटवा