थांब जोडीदारा...

 

थांब जोडीदारा... (प्राणीजगतातील काही प्रणयाराधनेचे प्रस्ताव)

 


    मानवच नाही तर इतरही प्राण्यांतही आपल्या जोडीदाराची निवड करण्याची प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक आणि वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. प्राणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपले प्रस्ताव आपल्याला आवडलेल्या जोडीदारासमोर ठेवतात. नैसर्गिक निवड प्रक्रियेचा
परिपाक असलेली ही जोडीदार निवडण्याची प्रक्रिया ‘आपली भविष्यातील संतती उत्तम प्रतिची  कशी बनेल आणि जीवंत राहण्याच्या नैसर्गिक संघर्षात इतर सजातीय स्पर्धकांना तुल्यबळ कशी ठरेल या निकषांवर केली जाते.

जोडीदार निवडीची प्रक्रिया जेंव्हा नर व मादी हा फरक  सजीवांमधे उत्क्रांतीकाळात निर्माण झाला तेंव्हापासुनची आहे. नराच्या शुक्राणुंसाठी आवश्यक उर्जेच्या तुलनेत मादी आपल्या बिजामधे अधिक प्रमाणात उर्जेची गुंतवणूक करत असल्याने नराच्या तुलनेत मादी जोडीदार निवड करताना अधिक सजग असते. आपल्या मानवी जगातील डेटींग पेक्षाही प्राणी जगतातील प्रणयाराधनेच्या पद्धती अनेक प्रकारे वैविध्यपूर्ण आणि आश्चर्यकारकही आहेत.

यापैकीच काही....

    प्रेयींग मॅंटीस या नर किटकाचा  प्रणयाराधनेचा काळ त्याचा अंतकाळ ठरु शकतो. हा नर त्याला पसंत पडलेल्या ज्या मादीसमोर स्वत:ला सादर करतो तीला तो न आवडल्यास ती त्याचे डोके चावून-चावून तोडून टाकते! इतर काही संदर्भानुसार मेटींग दरम्यान वा नंतरही मादी नराचे डोके (खरेखुरे) खाऊन टाकते.

अर्थात प्राण्यांच्या राज्यात सर्वत्र अशी हिंसा नाही.

नर नर्सरी वेब स्पायडर आपल्याला आवडलेल्या मादीकडे जाताना काही खाद्यपदार्थ सुंदर पांढऱ्या रेशमी धाग्यात गुंडाळून घेऊन जातो. असे खाद्यपदार्थ नेणे ही प्रणयाराधनेची विनंती असते. मादी मग ते खाद्यपदार्थाचे पाकीट उघडून तपासुन पाहते आणि मगच स्वीकारते. कारण काही नर भूक लागल्यास त्या पाकिटातील खाद्य अशा प्रकारे खाऊन टाकतात की ते मोकळे आहे असे समजतही नाही. आणि काही नर तर चक्क झाडाची एखादी फांदीच रेशमी धाग्यात बांधुन आणतात! ती काय खाणार? तरिही कधी कधी वरचे पॅकींग आणि वजन बघुन मादी फसतेही. शेवटी जे व्हायचे तेच होते. नराने आपल्याला फसवले आहे हे जेंव्हा मादीच्या लक्षात येते- ते नाते तिथे तात्काळ संपते.

 

हॅंगिंगफ्लाय या किटकांमधे भेटीसाठीच्या खाद्यपदार्थाचा मोठा आकार महत्वाचा ठरतो. नर जास्तीत जास्त मोठा किटक मारुन तो मादीला आणून देतो. मादी जेवढा वेळ खाण्यात मग्न असेल तेवढ्या वेळातच नराला आपले शुक्राणू मादीच्या शरिरातील शुक्राणू साठवण्याच्या पिशवीत- ती पिशवी भरेपर्यंत-पाठवायचे असतात. हा नराचा कार्यक्रम पूर्ण होण्याच्या आधीच मादीने खाद्य संपवले तर ती सरळ लाथा घालून नराला हाकलून लावते. जर मादीची शुक्राणू साठवण्याचा पिशवी आधी भरली आणि  काही खाद्य मादीसमोर शिल्लक असेल तर नर सरळ ते  उचलून घेऊन दुसऱ्या मादीच्या शोधात निघुन जातो.

प्राण्यांचे सर्वच प्रस्ताव काही अन्नाशी संबंधीत नसतात. अंटार्क्टीका मधील ॲडली पेंग्विन नर लहान लहान दगड गोळा करुन आपल्याला आवडलेल्या मादीसमोर ठेवतात. तीला जर ते आवडले तर नरासोबत प्रणयासाठी तयार होते. ते दगड नंतर ती घरटे बांधण्यासाठी वापरते. हा नर जर काही कारणाने घरट्यापासुन दूर गेला आणि दरम्यान एखाद्या दुसऱ्या नराने तीला आवडतील असे दगड तीच्यासमोर सादर केले तर ती त्याच्यासोबतही रत होते.

बावरबर्ड नर पक्षी काटक्यांचा /काड्यांचा त्याच्यापरीने सुंदर ढिग तयार करतो आणि तो निळ्या रंगांच्या काही वस्तुंनी सजवतो. (नर आपली निवडीची संधी वाढावी याककरिता एकमेकांचे हे काटक्यांचे ढिग आणि त्यावरील सजावट चोरतात, मोडतात, विस्कटतात). मादी पक्षी जेंव्हा हे ढिग तपासण्यासाठी येतात, तेंव्हा नर नृत्य करुन दाखवतात.

प्राणिजगत अभ्यासताना अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तनाचे नमुने आढळतात. काही वर्तणूकी मनोरंजक तर काही आश्चर्यकारकही आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट