चाॅकलेट
प्राचीन मेक्सिकन लोकांचा विश्वास होता की ज्यापासुन चाॅकलेट बनते ते कोको बियाणे शहाणपणाचा देव क्वेत्झलकोएटलची देणगी आहे. त्यासोबत असेही सांगितले जाते की केवळ देवांसाठीच्या या कोको बिया वा चाॅकलेटची मानवाला माहिती करुन दिल्याने इतर देवता क्वेत्झलकोएटल वर नाराज झाल्या होत्या.
अशा या देवप्रिय चाॅकलेटविषयी या धाग्यात काही शास्त्रीस व इतर रुचीपूर्ण माहिती देत आहे.
मिथके व इतिहास
मेसोअमेरिकामध्ये (उत्तर अमेरिकेतील मध्य मेक्सिको ते कोस्टारिका हा सासंकृतीक भाग) चॉकलेटचा या क्षणी मानवाला ज्ञात असलेला इतिहास सुरू होतो. चॉकलेटपासून बनविलेली किण्वित पेये इ.सन पूर्व ४५० वर्षांपूर्वी वापरली जायची असे पुरावे आढळलेले आहेत. अझ्टेक संस्कृती मधे पती-पत्नीमधील होणाऱ्या मिलनाचा पूर्वसंकेत म्हणून विवाहसोहळ्यात कोकाे बियाणे वापरली जात होती असे इतिहासकार सांगतात.
कोको बियाणे शहाणपणाचा देव क्वेत्झलकोएटलची देणगी आहे या मान्यतेमुळे त्या बियाण्याला एकदा इतके मूल्य प्राप्त झाले की ते एखाद्या चलनाच्या रुपात वापरले जात होते. सुरुवातीला केवळ पिण्यासाठी म्हणूनच तयार केले जात असलेले चॉकलेट, मक्याचे पदार्थ व मसाले यांच्या मिश्रणासह एक कडवट चवीचे पेय म्हणूनच वापरले जात असे. हे कोको पेय कामोत्तेजक आणि बलवर्धक समजले जात असे. अशी पेये "चिलेट" म्हणून देखील ओळखली जातात आणि दक्षिणेकडील स्थानिक मेक्सिकन लोक आजही पारंपरिक पद्धतीने ही पेये बनवतात.
सोळाव्या शतकात युरोपला सर्वप्रथम चाॅकलेटची ओळख झाली. युरोपियन्सनी प्रथम त्या कडवट कोको बियांच्या पावडरमधे साखर मिश्र केली. हे साखरमिश्रीत चाॅकलेट पेय आधी सरंजाम वर्गात आणि नंतर सर्वसामान्य समाजात चांगलेच लोकप्रिय झाले. जेंव्हा विसाव्या शतकात युद्धे सुरु झाली तेंव्हा अमेरिकन सैनिकांच्या रेशनमध्ये चॉकलेट आवश्यक भाग मानले जात असे.
चॉकलेटचे प्रकार:
चॉकलेटचे ब्रॅंड अनेक असले तरी मुख्य तीन प्रकार आहेत - व्हाइट चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट. 'चॉकलेट लिकर', ज्याला कधीकधी शर्कराविरहीत चॉकलेट म्हणून ओळखले जाते, ते सर्व प्रकारच्या चॉकलेटचा आधार आहे. ही जाड, गडद तपकिरी पेस्ट कोको बियांच्या आत सापडणाऱ्या निबपासून तयार केली जाते.
व्हाइट चॉकलेट त्याच्या क्रीम किंवा हस्तिदंती रंगामुळे ओळखणे सोपे आहे. हे साखर, कोकाआ बटर, दूध, व्हॅनिला आणि लेसिथिन एकत्र करून बनविले जाते. हे घटक पांढर्या चॉकलेटला त्याचा गोड व्हॅनिला गंध देतात.
मिल्क चॉकलेट अभिजात समजले जाते. हे आपल्या सर्वांना लहानपणापासूनच माहित असते आणि आवडतेही. याचा हलका तपकिरी रंग, मलईयुक्त पोत आणि गोड चव या सर्वांसह मिल्क चॉकलेट सर्वसामान्य: चॉकलेटचा सर्वात लोकप्रिय प्रकार मानला जातो. हे साखर आणि दुधासह चॉकलेट मद्य (कोको सॉलिड्स आणि कोकोआ बटर) एकत्र करून बनविले जाते.
डार्क चॉकलेट, त्याच्या उल्लेखनीय गर्द तपकिरी रंगासह, चॉकलेटचा दुसरा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. कधीकधी याला ब्लॅक किंवा सेमिस्वीट चॉकलेट म्हणून संबोधले जाते आणि साहजीकच मिल्क चॉकलेटपेक्षा ते कमी गोड असतात. अलिकडच्या वर्षांत, डार्क चॉकलेटने आरोग्यास होणार्या फायद्यांबद्दल अनेक लेख प्रकाशित केल्यामुळे त्याची तरुण वर्गात लोकप्रियता वाढली आहे. डार्क चॉकलेट बर्यापैकी सोपे आहे. हे सामान्यत: चॉकलेट मद्य (लीकर) आणि साखर या दोन घटकांपासून बनविले जाते.
प्रेम गोड असते?
प्रेम गोड असते म्हणतात. यासंबंधी विज्ञानपत्रीका Journal of Social and Personal Relationships मधे "Sweet Love: The Effects of Sweet Taste Experience on Romantic Perceptions," या मथळ्याखाली काही प्रयोगांचे निष्कर्ष प्रकाशीत झाले आहेत. ज्यामधे खास करुन गोड पदार्थ व त्याने मेंदुमधे निर्माण होणारी प्रेमभावना यांचा अभ्यास केला आहे. यानुसार ज्या अविवाहित किंवा कोणाशी वचनबद्ध नसणाऱ्या लोकांना जेंव्हा काही गोड पदार्थ (चाॅकलेट नव्हे) खाण्यास दिले तेंव्हा त्यांनी मनातील प्रेमभावना वाढल्याचे मान्य केले. गोड चाॅकलेट खाण्याने मेंदुतील डोपामाईनचा स्त्राव वाढतो असे सांगितले जाते.
चाॅकलेट खाल्ल्याने नेमके काय घडते?
जसजसे आपण चघळत-चघळत चव घेत चाॅकलेट खात जातो, तसतसे आपले शरीर त्या चाॅकलेटमधे असणाऱ्या वेगवेगळ्या ३०० पेक्षा अधीक संयुगांना पचवण्यास आणि चयापचय करण्यास सुरवात करते. त्यापैकी काही मुख्य संयुगे आणि त्यांचे परिणाम असे आहेत:
ट्रिप्टोफेन आणि सेरोटोनिन: विश्रांती आणि ठीक असण्याची भावना निर्माण करतात.
कॅफिनः तात्पुरती सतर्कता निर्माण करतो.
झेंथाइन्सः हे सौम्य उत्तेजक मेंदूमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवते आणि कॅफिनप्रमाणे जागृतपणा वाढवते.
थियोब्रोमाइन: हे उत्तेजक आणि वॅसोडायलेटर रक्त प्रवाह वाढवते.
फेनिलेथिलेमाइनः हे कंपाऊंड डोपामाइन सोडण्यासाठी मेंदूला उत्तेजित करते, डोपामाईन हे आनंद आणि प्रेरणा या भावनांशी संबंधित न्यूरोट्रांसमीटर आहे.
आनंदमाइडः संस्कृत “आनंद” पासुन नाव प्राप्त झालेले हे न्यूरोट्रांसमीटर नावाप्रमाणेच मेंदूस आनंदग्रहण करण्यास सक्रिय करते.
फ्लेव्होनॉल्सः रेड वाइन, ब्लूबेरी आणि ग्रीन टी सारख्या पदार्थांमध्ये देखील हे आढळून येते, ही संयुगे चयापचयानंतर दोन ते तीन तासांपर्यंत मेंदूच्या मुख्य भागात रक्त प्रवाह वाढवतात आणि एस्पिरिनसारखे सौम्य वेदनाशामक (पेनकिलर) प्रभाव तयार करतात.
चाॅकलेटविषयी अजुनही बरीच माहिती देता येणे शक्य आहे. तात्पुरती या ब्लाॅगमधे एवढीच!

Ufffffff itna kon padta h bhaijan aur wo b marathi me dimag ghum gaya pura
उत्तर द्याहटवाVery informative
उत्तर द्याहटवाThanks!
हटवाछान माहिती दिलीत...
उत्तर द्याहटवा