एडमंड फिशर

 अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात महान कार्ये, लेखन, संशोधन  करतात, पण त्या कार्यांचे याची देही याची डोळा योग्य ते श्रेय किंवा सार्थक झालेले पाहायला ते असत नाहीत. मेंडेल पासुन अनेक शास्त्रज्ञांची अशी उदाहरणे देता येतील.

संशोधक शास्त्रज्ञ एडमंड फिशर त्यांच्या १०१ वर्षाच्या सुदैवी आयुष्यात त्यांनी केलेल्या शोधाचा वैद्यकशास्त्र आणि पर्यायने मानवी जीवनास झालेल्या अनमोल योगदानाचे आणी लाभाचे  साक्षीदार ठरले. त्यांच्या शोधामुळे आजवर लाखो लोकांचे जीव वाचले आहेत.

सन १९२० मधे फ्रेंच आई आणि आॅस्ट्रीयन वडीलांच्या पोटी चिन मधे जन्मलेले- प्रथम ईटली नंतर स्वीस आणि शेवटी अमेरिकन नागरिकत्व घेतलेले एडमंड फिशर नुकतेच १०१ वर्षांचे होऊन मृत्यु पावले.

एडमंड फिशर यांनी पेशींमधील रिव्हर्सीबल प्रोटीन फॉस्फोरायलेशनचे पहिले उदाहरण शोधले. ही प्रक्रिया पेशींच्या जीवनकार्यांचे बहुतांशी पैलू नियंत्रित करते. पेशींमधील सर्व जैवरासायनीक अभिक्रीयांसाठी एन्झाइम आवश्यक असतात. या एन्झाइमचे मुख्य दोन वर्ग-, प्रोटीन कायनेज आणि प्रोटीन फॉस्फेटेज ज्ञात आहेत. ही एन्जाइम प्रोटीन आणि फॉस्फेट यांना अनुक्रमे ‘संलग्न करणे’ आणि ‘वेगळे करणे’ अशी (Reversible) कामे करतात. हे वरकरणी साधे वाटणारे बदल प्रोटीनचे कार्य अनेक मार्गांनी बदलतात. प्रोटीन्सचे कार्य सुरु करणे किंवा बंद करणे, त्यांना इतर प्रोटीन्सशी संवाद/अभिक्रीया साधु देणे, किंवा त्यांचे पेशीच्या एका  प्रभागातून दुसरीकडे स्थलांतर अशा अनेक बाबतीत ही एन्झाइम (प्रोटीन कायनेज आणि प्रोटीन फॉस्फेटेज) महत्वाचे संदेश देत असतात. या मूलभूत अशा शोधामुळे फिशर आणि त्यांचे सहकारी एडविन क्रेब्स यांना सन १९९२ मध्ये शरीरविज्ञान व वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

मानवी पेशींमध्ये ज्ञात ५०० पेक्षा अधीक प्रोटीन कायनेज आणि जवळजवळ २०० प्रोटीन फॉस्फेटेज असतात. हे सर्व एकाच वेळी असंख्य प्रथिनांवर कार्य करतात. कायनेजेस आणि फॉस्फेटेसचे उत्परिवर्तन (mutation) किंवा अतिउत्पादन कर्करोग आणि इतर रोगांना कारणीभूत ठरते. या माहितीच्या आधारे इमॅटिनिब हे औषध एखाद्या विशिष्ट प्रोटीन कायनेजला लक्ष्य करून १९९८ मधे विकसित करण्यात आलेले पहिले औषध ठरले. इमॅटिनीब तीव्र  क्रॉनिक मायलॉईड ल्युकेमिया या प्राणघातक आजारास नियंत्रित करण्यात यशस्वी ठरले. 

सध्या प्रोटीन कायनेज हे फार्मास्युटिकल उद्योगाचे “लक्ष्यवेधी औषधांच्या वर्गातील (targeted medicine)” सर्वाधीक चालणारा प्रकार बनला आहे. या शतकात ७० पेक्षा अधीक कायनेज-प्रतिबंधक औषधे आधीच मंजूर केली गेली आहेत, ज्यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये बदल घडू शकतो.


https://www.nature.com/articles/d41586-021-02485-8?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+nature%2Frss%2Fcurrent+%28Nature+-+Issue%29&utm_content=Google+Feedfetcher

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट